अध्याय १: वेळ म्हणजे नक्की काय?

vel mhanje nakki kay

वेळ हा जगातील सर्वात जुना, पण तरीही सर्वात आधुनिक असा संकल्पना आहे. प्राचीन काळात लोक त्याच्या मागे नव्हते, तो त्यांच्या जीवनशैलीचा भाग होता. सूर्य उगवला म्हणजे दिवस, सूर्य मावळला म्हणजे रात्र. एवढीच गणितं. पण आधुनिक माणसाने वेळेचे गणित इतके अवघड केले की आता वेळ म्हणजे घड्याळ, कॅलेंडर, नोटिफिकेशन, मिटींग शेड्युल, रिमाइंडर आणि अलार्म यांच्या चक्रव्यूहात अडकलेली गोष्ट झाली आहे.

पण एकदा शांतपणे विचार केला तर वेळ म्हणजे नक्की काय? काहीतरी आपल्याला दिसतं का? नाही. ऐकू येतं का? नाही. वास तर अजिबात नाही. तरीही तीच वस्तू आपल्याला सकाळपासून रात्रीपर्यंत खेचत घेऊन जाते. आपण तिला कधी पकडू शकत नाही, पण ती मात्र आपल्याला कसं पकडून ठेवते – हे नवलच आहे.

वेळाची गंमत अशी आहे की ती प्रत्येकासाठी वेगळी काम करते. तुम्ही पाच मिनिटे बसून शांत चहा पिता आहात, तेव्हा ती मिनिटं जणू आकाशात थांबून राहतात. आणि दुसऱ्या बाजूला, जास्त मेहनत, जबाबदारी किंवा ताण असलेल्या क्षणी तीच मिनिटं क्षणात गायब होतात. म्हणजेच वेळ ही एकाच वेळी दोन्ही गोष्टी असते – धीमीही, आणि झपाट्याने जाणारीही.

एखाद्या मुलाला उन्हाळ्याची सुट्टी कधी संपते ते कळत नाही. आपणच बघा, सुट्टीच्या दिवसात वेळ अगदी हळूहळू, मस्तपणे जातो. आणि कामाच्या दिवसात, ऑफिसच्या ईमेलसारखा, एकदम झपकन् निघून जातो. म्हणजेच वेळ ही घड्याळातली टिक टिक नसून आपण काय करतो, कसं करतो, आणि कोणासोबत करतो त्यावर अवलंबून असते.

वेळ हा एक प्रकारचा आरसा आहे. तो आपल्याला दाखवतो की आपण कुठे आहोत आणि कुठे जात आहोत. काही लोक म्हणतात की वेळ बदलतो. पण सत्य एवढंच आहे की वेळ तसाच असतो. बदलतो आपण, आपले निर्णय, आपली प्राधान्यक्रम(priorities) आणि आपल्या सवयी. वेळ फक्त त्याच्या प्रवाहात सर्व काही वाहून नेतो.

Img 6547

कधी तुम्हाला लक्षात आलंय का, की काही लोकं वेळेचं उत्तम नियोजन करतात, आणि काहींना नेहमी वेळ कमी पडतो? वेळ कमी कोणाकडेच नसतो – फरक असतो तो त्यांच्या पद्धतीत, त्यांच्या विचारात. काही लोक वेळेचा वापर करून घेतात, तर काही लोक वेळेच्या मागे धावत राहतात.

खरं तर वेळ ही कल्पना मनाने निर्माण केलेली आहे. पण हीच कल्पना आपल्यावर एवढा प्रभाव टाकते की संपूर्ण आयुष्य तिच्या आधारावर फिरतं. एखाद्या गोष्टीला “योग्य वेळ” म्हणतो, एखाद्या प्रसंगाला “वाईट वेळ” म्हणतो, आणि कधी कधी तर आपणच ठरवतो की “माझी वेळ आता आली आहे”. या सगळ्या गोष्टी वेळेनं ठरवलेल्या नसतात – त्या आपल्या मनाच्या व्याख्या असतात.

वेळ कसा काम करतो हे समजून घेतलं तर आपण जगायला लागतो, आणि वेळेचं मूल्य कळतं. वैज्ञानिक म्हणतात की वेळ ही सतत पुढे जाणारी सरळ रेषा आहे. पण मनोवैज्ञानिक म्हणतात की वेळ ही आपल्या अनुभवांची गाठोडी आहे – जेवढा अनुभव समृद्ध, तेवढा वेळ अधिक अर्थपूर्ण.

कवी म्हणतो की वेळ ही स्मृतींची वाहती नदी आहे. तर घरातील ज्येष्ठ लोक म्हणतात की वेळ शिकवतो, घडवतो, आणि स्वतःच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो.

अर्थात, वेळ म्हणजे एकाच वेळी साधी आणि गुंतागुंतीची अशी गोष्ट. तुम्ही त्याला पकडू पाहिलं तर नाही पकडता येत. पण तुम्ही त्याच्यासोबत निवांत चाललात तर तो तुमचा उत्तम साथी बनतो. कुणी वेळ मागतो, कुणी वेळ देतो, कुणी वेळ साधतो, तर कुणी वेळ घालवतो. पण वेळ स्वतः मात्र कधी थांबत नाही. तो शांतपणे, स्थिरपणे, आपल्या जगण्याला आकार देत राहतो.

वेळेचं खऱ्या अर्थाने महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्याची गती समजून घेतो. वेळ म्हणजे फक्त घड्याळावरचे अंक नव्हेत, वेळ म्हणजे आपले निर्णय, आपली कृती, आपले अनुभव, आणि त्या सगळ्यांच्या दरम्यान घडणारी प्रगती. वेळेला पकडायचं नाही, वेळेला स्वीकारायचं, त्याच्याशी मैत्री करायची.

काही लोकांसाठी वेळ म्हणजे “पुढे ढकलणारी गोष्ट” म्हणजे उद्या करू, परवा करू. तर काहींसाठी वेळ म्हणजे “आत्ताच करणारी गोष्ट” कारण त्यांना माहिती असतं की संधी तर संधीच असते, पुन्हा येईल याची शाश्वती नाही. कोणं बरोबर, कोणं चूक? दोघेही योग्य, कारण वेळ ही कधीच एकाच माणसासाठी एकाच पद्धतीने काम करत नाही. तो आपले मार्ग स्वतःच ठरवतो.

आणि म्हणूनच वेळेची ओळख करून घेणं गरजेचं आहे. त्याचा स्वभाव समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण वेळचं खरं महत्त्व ओळखलं की आयुष्य स्वतःच सोपं होतं, आपली प्राधान्यं स्पष्ट होतात, आणि आपण दिशाहीन पळापळीपासून दूर जाऊन शांतपणे, स्थिरपणे, अर्थपूर्ण जगायला लागतो.