गावात लग्नाचं वातावरण होतं, पण त्या वातावरणात रमाच्या मनात गोंधळ होता. वय लहान, स्वप्नं मोठी. तिचं मन अजूनही आईच्या कुशीतल्या मायेच्या उबेत होतं, पण नियतीनं तिच्या हातात नव्या आयुष्याची दोरी दिली होती.
रमाचा विवाह एका तरुणाशी ठरला होता, त्याचा नाव होत भीमराव, वाचनात रमलेला, शांत स्वभावाचा, पण डोळ्यांत आग असलेला मुलगा. समाजाच्या प्रथेनुसार, दोघांनाही एकमेकांविषयी फारसं काही माहित नव्हतं. पण ती पहिली भेट – साधी, पण आत्म्याला हलवून टाकणारी.
लग्नाच्या दिवशी सकाळी आकाश ढगाळ होतं. मंद पावसाच्या सरींनी सगळं गाव चकचकीत झालं होतं.
रमा आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती. आई म्हणाली,
“ग, आता तू परक्या घरात जाणार. पण लक्षात ठेव, तुझं मन कधीही परकं होऊ देऊ नकोस.”
रमाने शांतपणे मान हलवली. तिच्या डोळ्यांत भीती होती, पण त्याहून मोठं काही होतं ती म्हणजे जबाबदारी.
लग्न सोप्या पद्धतीने झालं. लोकं नाचत होती, गाणी गात होती, पण रमा मात्र शांत होती. तिच्या नजरेसमोर फक्त एक चेहरा होता – भीमरावांचा.
तो फारसं बोलत नव्हता, पण त्याच्या डोळ्यांत विचित्र गडदपणा होता.
जणू त्या नजरेत काहीतरी शोधायचं होतं, जग बदलायचं होतं, आणि त्या शोधात रमाबाई नकळत सहभागी झाली होती.
पहिल्या रात्री दोघं फारसं बोलले नाहीत.
फक्त एक हलका संवाद झाला
“तुम्हाला काय आवडतं?” रमाने विचारलं.
भीमराव थोडं हसले, “पुस्तकं. आणि शांतता.”
“शांतता एवढी गोड कशी असते?” रमाने विचारलं.
“कारण शांततेत विचार जन्म घेतात.”
त्या एका उत्तराने रमा थोडी गोंधळली, पण त्या क्षणी तिला समजलं, तिचा नवरा वेगळा आहे.
जगाच्या गर्दीत न बसणारा, पण जग बदलण्याचं स्वप्न पाहणारा.
पुढचे काही दिवस रमा नवीन घराशी जुळवून घेत होती.
स्वयंपाक, पाणी, घरकाम सर्व तिच्या जबाबदारीत आलं होतं.
भीमराव मात्र नेहमी अभ्यासात, वाचनात, विचारात गुंतलेले.
कधी-कधी ते एखादं वाक्य मोठ्याने बोलायचे
“माणूस माणसात भेद का करतो?”
रमाबाई त्यांना पाणी देताना शांतपणे विचारायची,
“देवाने नाही केला, मग माणूस का करतो?”
भीमराव थोडं हसून म्हणायचे,
“बहुधा माणसाने स्वतःला देव समजायला सुरुवात केली म्हणून.”
रमाबाई त्यांचे विचार पूर्णपणे समजत नव्हती, पण त्या विचारांमागचं प्रामाणिकपण तिला जाणवत होतं.
ती स्वतःसाठी नव्हे, त्यांच्यासाठी जगायला लागली होती.
एका संध्याकाळी, रमा घरातल्या दिव्याजवळ बसली होती.
भीमराव परतले तेव्हा त्याच्या हातात पुस्तकांचा गठ्ठा होता.
रमा म्हणाली,
“इतकी पुस्तकं वाचून काय मिळतं तुम्हाला?”
ते म्हणाले,
“उत्तरं.”
“आणि मिळाली का?”
“अजून नाही… पण शोधणं थांबवलं नाही.”
त्या वाक्याने रामाचे मन खोलवर हललं.
तिला जाणवलं, तिचं आयुष्य आता एका शोधकाच्या सोबतीत सुरू झालं आहे.
ते जग बदलायच्या विचारात गुंतलेले, आणि ती त्यांचं जग टिकवून ठेवणारी.
रमा त्या काळात इतर स्त्रियांपेक्षा भिन्न होती.
ती गप्प राहायची, पण तिच्या गप्पीतही अर्थ असायचा.
ती कधीच आपली तक्रार मांडली नाही.
कधी भीमराव रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसायचे, दिवा विझवायचं विसरायचे.
ती उठून शांतपणे दिवा विझवायची, त्यांच्याकडे बघून म्हणायची,
“देवा, त्यांना शक्ती दे. त्यांच स्वप्न माझंही आहे.”
काळ सरकत गेला.
रमा आई झाली.
पण त्याच वेळी गरिबी, समाजातील तिरस्कार, आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठीचा संघर्ष सगळं एकत्र आलं.
रमा मुलाला झोपवायची, आणि बाहेर पावसाचा आवाज ऐकत बसायची.
तिला माहिती होतं, तिचं आयुष्य सोपं नाही.
पण तिचं मन मात्र न तुटणारं होतं.
ती म्हणायची,
“गरिबी आपल्याला वाकवते, पण मोडत नाही.”
भीमरावांच्या विचारांनी तिचं जग बदललं, पण त्या बदलात तिचं अस्तित्वही हरवू लागलं.
लोक म्हणायचे,
“तो मोठा होईल. पण त्याची बायको? ती फक्त घर सांभाळते.”
रमा हसून म्हणायची,
“घर सांभाळणं म्हणजे जग सांभाळणं.”
त्या काळात समाजात स्त्रियांना आवाज नव्हता, पण रमाबाईचा मौनच तिचा आवाज होता.
ती फार बोलली नाही, पण तिचं जगणं बोलत राहिलं.
ती समजली होती — काही लोक मोठं नाव मिळवतात, काही लोक त्या नावामागचं जीवन घडवतात.
आणि ती दुसऱ्या प्रकारातील होती.
त्या रात्री, भीमरावांनी तिला सांगितलं,
“मला परदेशात शिकायला जायचं आहे.”
क्षणभर तिचा श्वास अडखळला.
तिने विचारलं,
“कधीपर्यंत?”
“काही वर्षं…”
तिचे डोळे ओलावले, पण ती म्हणाली,
“जा. पण लक्षात ठेवा, तुमच्या यशात माझंही आयुष्य दडलं आहे.”
त्या एका वाक्यात प्रेम, समर्पण, आणि शक्ती होती.
भीमरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला, आणि पहिल्यांदाच शांतपणे म्हणाले,
“रमा, तू माझं आधार आहेस.”
त्या क्षणी रमा थोडं हसली.
तिला माहीत होतं, तिचं आयुष्य आता संघर्षाचं होणार आहे.
पण तिला हेही ठाऊक होतं, तिचा नवरा जग बदलणार आहे.
आणि ती त्या स्वप्नाचा एक मूक भाग बनणार होती.

