कविता शांत बसली होती. टेबलावर एक कोरी पांढरी कागदाची शीट आणि बाजूला एक जुनं पेन ठेवलेलं होतं.
खिडकीतून पडणाऱ्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पसरवला होता, पण तिच्या डोळ्यांत मात्र एक खोल अंधार होता.
“काय झालं कविते?” तिचा नवरा, अभिजीत, बाहेर जाताना विचारतो.
ती हसते. “काही नाही. नेहमीसारखं सगळं.”
“नेहमीसारखं” हे तिचं आवडतं खोटं होतं.
दररोजचं आयुष्य जणू कुणीतरी ठरवल्यासारखं चालू होतं
सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी काम, आणि रात्री शांतता.
पण तिच्या आत काहीतरी शांत नव्हतं.
त्या रात्री ती उठली आणि खिडकीजवळ बसली.
तिचं मन भरून आलं होतं.
ती वही उघडते, आणि लिहायला सुरुवात करते.
“प्रिय मी,”
खूप दिवस झाले तुझ्याशी बोलले नाही.
तू आता ओळखू येत नाहीस, तुझं हसू हरवलंय, तुझा आत्मविश्वासही.
तू सगळ्यांसाठी जगलीस, पण स्वतःसाठी कधी जगलीस का?
तू नेहमी समजूतदार राहिली, पण आता थोडी ‘स्वार्थी’ हो.
कारण तुला देखील हक्क आहे आनंदाचा.
तू तुटली नाहीस, तू फक्त थकली आहेस
आणि हे ठीक आहे.
उद्या सकाळी जेव्हा आरशात पाहशील, तेव्हा स्वतःला सांग,
“मी पुरेशी आहे. मी अपूर्ण नाही. मी जिवंत आहे.”
तुझीच, तू.
ती लिहून थांबली.
कागदावर पाण्याचे थेंब पडले – तिच्या डोळ्यांतले.
पण ते दु:खाचे नव्हते, ते मोकळेपणाचे होते.
त्या क्षणी तिला जाणवलं
कधी कधी आपल्याला दुसऱ्यांना पत्र लिहायची गरज नसते
कधी कधी स्वतःलाच लिहिलेलं पत्र सर्वात महत्त्वाचं असतं.
दुसऱ्या दिवशी ती उठली आणि आरशात स्वतःकडे पाहिलं.
चेहऱ्यावर एक हलकंसं हसू होतं.
तिच्या डोळ्यांत आता वेदनेपेक्षा शांतता होती.
ती स्वतःलाच हलकेच म्हणाली,
“धन्यवाद… ह्या पत्राणी मला पुन्हा जिवंत केलं.”
त्या दिवसानंतर कविता रोज स्वतःसाठी काही ओळी लिहू लागली
कधी आनंदाच्या, कधी वेदनेच्या, पण प्रत्येक शब्द तिच्या आत्म्याला मुक्त करत होता.
स्त्री अनेकांना पत्रं लिहिते – मुलाला, नवऱ्याला, जगाला.
पण जेव्हा ती स्वतःलाच पत्र लिहिते,
तेव्हा ती स्वतःकडे परत येते.
तेच तिचं पुनर्जन्माचं क्षण असतं.

