अध्याय ८: नात्यांमधील वेळ – बोलणे, ऐकणे आणि समजून घेणे

natyatil vel

आपल्या आयुष्यात वेळ कुठे जावा हे आपण ठरवतो, पण काही क्षण असे असतात जे आपण जाणीवपूर्वक द्यायला हवेत – विशेषतः नात्यांना.
नाती ही वेळेवर चालणारी घड्याळं नाहीत, पण वेळ दिला नाही तर ती थांबतात.
त्यातले काटे फिरत राहतात, पण संबंध मात्र मंदावत जातात.

नात्यांमध्ये वेळ देणं म्हणजे एखाद्या मोठ्या तत्त्वज्ञानाचं काम नाही.
ते साधं, सोपं आणि मानवी आहे
· बोलणं
· ऐकणं
· समजून घेणं
· आणि थोडं हसणं.

काही लोकांच्या मते, नात्यांना वेळ दिला की वेळ कमी पडतो.
खरं काहीही नाही, नात्यांना वेळ दिला की वेळ वाढतो.
कारण मन हलकं होतं, ताण कमी होतो आणि दिवसाचा भार कमी होत जातो.

नात्यांमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे उपस्थिती.
तुम्ही कोणासोबत आहात ते महत्त्वाचं नाही,
तुम्ही कसे आहात ते महत्त्वाचं.
तुमचं लक्ष तिकडे आहे का?
तुमचं मन त्या क्षणी आहे का?
की मेंदू कुठेतरी ऑफिसच्या मेलमध्ये फिरतोय?
हे नात्यातील व्यक्तीला कळतं, आणि सांगावं लागत नाही.

आजच्या डिजिटल युगात ही सर्वात मोठी अडचण आहे.
लोकं एकमेकांसोबत असतात,
पण एकमेकांसाठी नसतात.
चहाचा कप हातात असतो,
पण मन मोबाईलमध्ये असतं.

नात्यांना खरं तर वेळ तासांनी लागत नाही
कधीकधी फक्त ५ मिनिटांचाही वेळ एखादं नातं पुन्हा जिवंत करतो.
हळू, शांत, मनापासून दिलेला वेळ जगातील सर्वात मोठी गोष्ट ठरतो.

कुटुंबातील नात्यांमध्ये वेळ द्यायची कशी?
अगदी साधं,
· एकत्र जेवण
· दिवस कसा गेला हे विचारणं
· त्यांचं बोलणं न तोडता ऐकणं
· छोट्याशा गोष्टींवर हसणं
· आणि कधी कधी काही न बोलताही सोबत बसणं

काही वेळा माणसाला शब्द नको असतात – सोबत हवी असते.

मित्रांच्या नात्यात वेळ द्यायचा म्हणजे उपस्थित राहणं.
मित्रासाठी वेळ काढता येतो का?
अगदी १० मिनिटं का असेना.
हा वेळ नात्याला वर्षानुवर्षे बांधून ठेवतो.
मित्रांच्या नात्यात एक विशेष गोष्ट असते
पैसे लागत नाहीत, पण वेळ लागतो.
आणि हा वेळ दिला की नातं आयुष्यभर टिकतं.

जोडीदारांच्या नात्यात वेळ सर्वात संवेदनशील असतो.
एकमेकांशी बोलणं, ऐकणं, स्पष्टीकरण देणं,
आणि सर्वात महत्त्वाचं
एकमेकांना समजून घेण्यासाठी शांत वेळ द्यावा लागतो.

आजच्या जगात लोकं एकमेकांना ऐकतात कमी,
समजतात कमी,
पण प्रतिसाद देतात भरपूर.
जोडीदारांमधलं खरं ऐकणं म्हणजे
तुम्ही त्यांचा आवाज ऐकत नाही,
त्यांचं मन ऐकत असता.

नात्यांमधील वेळाचा सर्वात मोठा भ्रम म्हणजे
“तुला वेळ देतो ना मी!”
पण भवती बसणं म्हणजे वेळ देणं नाही.
वेळ देणं म्हणजे
त्या क्षणी तुम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीसोबत आहात.
तुमचं मन, लक्ष, भाव – सगळं.

Img 6564 300x300

सर्वात सुंदर नातेसंबंध तेच,
जिथे निःस्वार्थ वेळ दिला जातो.
हा वेळ ‘काम उरकल्यावर देतो’,
‘फावला तर देतो’,
किंवा ‘नंतर बघू’ असा नसतो.

तो वेळ असतो,
“तुझ्यासाठी वेळ काढतो” असा.

आणि हे लक्षात ठेवा
नात्यांना आपण दिलेला वेळ परत दुप्पट येतो.
आज छोटा एक फोन केला,
एक संदेश पाठवला,
एक चौकशी केली
यामुळे नातं आधीपेक्षा अधिक मजबूत होतं.

आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे,
वेळ हे नात्यांचं औषध आहे.
राग, गैरसमज, अंतर, यात वेळ दिला की ते मऊ होतात.
अर्थात त्यासाठी योग्य वेळ, योग्य बोलणं आणि योग्य मन आवश्यक असतं.

एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी वेळ लागत नाही,
पण त्या व्यक्तीला समजण्यासाठी वेळ द्यावा लागतो.
आणि समज वाढत गेली की नातं आपोआप मजबूत होतं.

जीवनात वेळ द्यायची तीन ठिकाणं,
१) नाती
२) स्वप्नं
३) स्वतः

यात पहिली गोष्ट मजबूत असेल तर बाकी दोन आपोआप जुळतात.
कारण आधार देणारं नातं, घर, वातावरण असेल तर वेळ अधिक चांगल्या गोष्टींसाठी मिळतो.

शेवटी इतकंच
नाती वेळ मागत नाहीत,
पण वेळ दिला नाही तर शांतपणे दूर जातात.
आणि वेळ दिला तर शांतपणे जवळ येतात.
नाती वेळ खात नाहीत,
ती वेळ वाढवतात.