आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, आपण वेळेच्या मागे धावतो की वेळ आपल्यामागे धावत असतो?
हाच प्रश्न अनेकदा सकाळच्या गडबडीत आपल्याला टोचतो. घरातून बाहेर पडताना अचानक जाणवतं की पाच मिनिटांचा उशीर आता वीस मिनिटांचा झाला आहे. एवढ्या छोट्याशा वेळेने संपूर्ण दिवसाचा मूड बदलतो. आणि तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? “वेळ कमी आहे!” पण खरं सांगायचं तर वेळ कमी नसतो, आपणच जास्त पळतो.
कधी लक्षात आलंय का? वेळ कधीच घाई करत नाही. तो शांत, स्थिर, आपली गती न बदलता पुढे जात राहतो. घाई करतो तो आपण. आपणच ठरवतो की एकाच दिवसात पंधरा कामं करायची, आणि मग आश्चर्याने विचारतो, “कसं काय वेळ जातो?”
वेळ शांतपणे म्हणतो, “मी तर त्याच वेगाने चाललोय, तुम्हीच धावायला घेतलंय.”
आधुनिक जगात आपण वेळेच्या मागे धावतो अशी भावना इतकी पक्की झाली आहे की तीच आता नेहमीची जीवनशैली झाली आहे. सकाळ झाली की धावपळ, काम सुरू झालं की धावपळ, काम संपलं की दुसऱ्या धावपळीची तयारी. आणि या सगळ्यात आपण इतके गुंतून जातो की श्वास घेणंही एक वेगळं काम वाटायला लागतं.
वेळ ही एक विचित्र गोष्ट आहे, जितकं त्याच्या मागे धावाल तितका तो जलद पळतो. पण जसजसं तुम्ही थांबता, विचार करता आणि नीट नियोजन करता, वेळ अचानक वाढल्यासारखा वाटू लागतो. म्हणजे वेळ आपल्या नियंत्रणात नसतो, पण आपला दृष्टिकोन मात्र पूर्णपणे आपल्याच हातात असतो.
कधी तुम्हाला असं वाटतं का की काही लोकांच्या आयुष्यात वेळ अधिक असतो? ते सर्व काही करतात – काम, जेवण, व्यायाम, सामाजिक जीवन, छंद, कुटुंब आणि तरीही त्यांच्याकडे निवांत वेळ असतो. आणि आपण? आपण काम करतच राहतो आणि दिवस उडून जातो. हे असं का होतं?
कारण हे लोक वेळेच्या मागे धावत नाहीत, ते वेळेला त्यांच्या सोबत घेऊन चालतात. ते वेळेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत, ते वेळेबरोबर नातं बांधतात. दोन्ही गोष्टींत मोठा फरक आहे.
एक मजेशीर उदाहरण बघा, आपल्याला जर सकाळी ८ वाजता एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल, तर आपण ७ वाजता उठतो. पण उठून लगेच हालचाल सुरू होत नाही. आधी १० मिनिटं बेडवरच बसून “थोडं अजून” या विचारात रमतो. मग मोबाईल हातात घेतो, आणि अचानक लक्षात येतं की सोशल मीडियावर १५ मिनिटे गायब झाली. मग घाईघाईत सगळं करायला लागतो आणि आपण बोलतो -“आज वेळ पुरलाच नाही!”
असं होतं का? की रोजचं आहे?
वेळच्या मागे लागण्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे आपण स्वतःला विसरतो. जेव्हा आपण वेगाच्या मागे धावतो तेव्हा लक्ष फक्त पुढच्या क्षणाकडे असतं. हे करा, तिथे पोहोचा, इथे लक्ष द्या… आणि या धावपळीत वर्तमान क्षणाचा आनंद गमावला जातो. आपण काय करतोय यापेक्षा ते किती वेगाने करतोय याचं महत्त्व जास्त उरते.
काही लोक म्हणतात, “वेळ कुणाची वाट बघत नाही.” हे खरं आहे. पण आणखी एक गोष्ट तितकीच खरी आहे, वेळ कधीच पुढे धावत नाही. आपण त्याच्याकडे कसं बघतोय यावर संपूर्ण कथा उभी आहे. जर तुम्ही शांतपणे, सुसंगतपणे, जागरूकपणे दिवस जगलात तर वेळ पुरतो, अगदी भरपूर पुरतो. पण तुम्ही घाई, गोंधळ, अनियोजन यांच्या ओघात अडकलात तर वेळ तुमच्या हातातून पाण्यासारखा निसटतो.

वेळेच्या मागे धावणे म्हणजे आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू पाहतो. पण वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी नाते समजते, आदेश नाही. तो तुमच्या शिस्तीचा आदर करतो, पण तुमच्या हट्टीपणाचा नाही. तो तुमच्या लक्ष केंद्रित कामांना संधी देतो, पण उगीचच केलेल्या गडबडीकडे दुर्लक्ष करतो.
कधी कधी असं जाणवतं की वेळ आपल्यामागे धावत आहे, विशेषतः जेव्हा आपण काही चांगलं करण्याच्या तयारीत असतो. जसे आपण एखादा निर्णय घेतो: उद्यापासून लवकर उठायचं, रोज व्यायाम करायचा, पुस्तक वाचायचं, घर व्यवस्थित ठेवायचं… आणि मग काय होतं? वेळ अचानक आपल्याला मागून आवाज देतो, “बघतोय होय! किती दिवस टिकतोस ते!”
यामुळेच वेळ कधी शत्रू वाटतो, कधी मित्र, कधी गुरु आणि कधी चेष्टा करणारा म्हणूनही उभा राहतो. पण त्याचा खरा स्वभाव समजला तर वेळाशी स्पर्धा करायची गरजच उरत नाही. आपली पळापळ कमी होते, आपली दिशा स्पष्ट होते आणि दिवस सहजपणे, शांतपणे पुढे जातो.
खरंच प्रश्न असा नाही की आपण वेळेच्या मागे धावतो का वेळ आपल्या मागे, तर खरा प्रश्न असा आहे की आपण कुठे धावतोय, का धावतोय, आणि त्या धावण्यात अर्थ आहे का?
वेळेला कधीही हरवता येत नाही. पण वेळेबरोबर चालता येतं – हो, नक्कीच येतं. त्यासाठी फक्त दोन गोष्टी लागतात: जाणीव आणि शिस्त. जाणीव म्हणजे आत्ता आपण काय करत आहोत ते जाणून-बुजून करणे. आणि शिस्त म्हणजे अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया होऊ न देणे.
या अध्यायातून इतकंच लक्षात ठेवा – वेळ शांत आहे, धावतो तो आपण. आणि आपला वेग कमी केला, दिशा ठरवली, आणि शांतपणे आयुष्य जगायला सुरुवात केली तर वेळ आपल्याला सोबत घेऊन चालतो.

